अज्ञानाच्या घनघोर अंधारात
विज्ञानवादी तुझे प्रबोधन
होते सत्यप्रकाशाचे किरण
कुप्रथांना जाळणारे कीर्तन
होतास धर्मांधतेचा कर्दनकाळ
शब्दांनी लोळविला स्वार्थी भट
भोळ्या जनतेला पटवून दिले
देवळात असते पुजाऱ्याचे पोट
अंगावर पांघरल्या चिंध्या पण
अंधश्रद्धेच्या केल्या चिंधळ्या
शोषणमुक्तीचा मार्ग दाखवीत
डोळस केले समाजास आंधळ्या
स्वच्छता अभियानाचा प्रवर्तक
झाडलेस गावोगाव घेऊन खराटा
गहाण मेंदूतील घाण साफ करत
स्वच्छ केल्या दूषित विचारवाटा
तिर्थयात्रांवर खर्चू नका पैसा
पोरांना घडवा, शिकवा नीट
शिक्षणाचा खरा मंत्र देणारे
होते चालते बोलते विद्यापीठ
मुलाच्या मृत्यूची वार्ता कळली
गेला पोटचा एकुलता एक गोळा
मानवतेच्या भजनात होता तल्लीन
म्हणत देवकीनंदन गोपाळा
मात्र बाबासाहेबांच्या निधनानंतर
बंद खोलीत टाहो फोडला
एका बाबानंतर दुसऱ्या बाबांनी
चौदा दिवसात प्राण सोडला
पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रवासात
परिवर्तनाचा एक प्रदीर्घ थांबा
चिकित्सक, बुद्धिवादी अवलिया
होता संतश्रेष्ठ कर्मयोगी गाडगेबाबा