कालची बातमी खरी नाही
हाय, स्वर्गात भाकरी नाही

देवदूता तुझा पगार किती?
कां मला सांग नोकरी नही?

तू मला घातलीस भीक जरी
ही तुझी मागणी बरी नाही

येथली ही सर्व घरे माझी
सांग, मी कोणत्या घरी नाही?

मागता काय लेखणी माझी..
ही कुणाचीच बासरी नाही!

एकट्याचाच हा सवाल नसे
आग ही कोणत्या उरी नाही?

राहिले काय पूर्णिमेत अता?
चंद्र माझा उशीवरी नाही!

  • सुरेश भट ( एल्गार)