2016 साली ‘सैराट’ रिलीज झाला आणि या सिनेमाने महाराष्ट्राला याडं लावलं. सिनेमानेच नाही तर या सिनेमाने अकलूजच्या एका पोरीलाही स्टार बनवलं. होय, आर्ची अर्थात रिंकु राजगुरू. आज आर्चीचा वाढदिवस...
2016 साली ‘सैराट’ रिलीज झाला आणि या सिनेमाने महाराष्ट्राला याडं लावलं. सिनेमानेच नाही तर या सिनेमाने अकलूजच्या एका पोरीलाही स्टार बनवलं. होय, आर्ची अर्थात रिंकु राजगुरू. आज आर्चीचा वाढदिवस…
चित्रपटात येण्यापूर्वी या रिंकूला कोणीही ओळखत नव्हतं. अगदी बाजूच्या गावातील लोकही तिला ओळखत नव्हते. पण आज हीच रिंकू बॉडीगार्ड घेऊन फिरते. महाराष्ट्र नाही तर अख्खा देश तिला ओळखतो.
सैराट या एका सिनेमाने रिंकू एका रात्रीत स्टार झाली. ‘सैराट’साठी नागराज मंजुळेंना सोलापुरी मातीतील मुलगी हवी होती. त्यांनी अनेक मुली पाहिल्या, पण हिरोईन म्हणून कुणीही त्यांच्या पसंत पडत नव्हत्या.
एके दिवशी काही कामानिमित नागराज आणि टीम अकलुज गेले. तिथे एक बिनधास्त, निर्भीड, गावकरी भाषेत नडेल त्याला फोडणारी काळी सावळी निरागस मुलगी त्यांच्या नजरेस पडली. जसं पात्र होतं अगदी तशीच मुलगी होती. चौकशी केली. तेव्हा समजलं तिचं नाव रिंकू राजगुरू होतं. तिच्या घरच्यांशी बोलुन तिला ऑडिशनला बोलवण्यात आलं.
जेव्हा रिंकूला कळलं की आपल्याला कुणीतरी मंजुळे नावाचा दिग्दर्शक पिक्चर मध्ये घ्यायचा विचार करतोय, तेव्हा तिला खुप आनंद झाला. दिग्दर्शक म्हणजे कुणीतरी मोठा माणूस असणार. राहणीमान भारी असणार वगैरे वगैरे. अश्या अनेक कल्पना डोक्यात घेऊन रिंकू नागराज कडे ऑडिशनला गेली.
पण एक साधासुध्या कपड्यातला माणूस दिग्दर्शक म्हणून तिच्यापुढे उभा होता. रिंकूने ऑडिशन दिले आणि ती सिलेक्टही झाली. यानंतर या रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही.
आता ही रिंकू बॉलिवूडमध्येही पर्दापण करतेय. नागराज मंजुळे यांच्याच ‘झुंड’ या बॉलिवूडपटात ती दिसणार आहे. हिंदी वेबसीरिजमधून तिने वेबविश्वातही पर्दापण केले आहे.
गेल्या काही वर्षांत रिंकू कमालीची बदलली आहे. अकलूजची ही पोरगी आता स्टार झालीये. लूक बदलले आणि आयुष्यही.
रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटानंतर जेव्हा सिनेइंडस्ट्रीतील जग पाहिले तेव्हा तिला स्वतःमध्ये बदल करावासा वाटला. कारण सैराट चित्रपटात काम करण्याआधी सिनेइंडस्ट्रीबद्दल माहित नव्हते. चित्रपटाच्या संपूर्ण प्रोसेसदरम्यान देखील फारसे माहित नव्हते.
मी सैराट चित्रपटानंतर बाहेर पडले, चार लोकांना भेटायला लागले, बोलायला लागले. तेव्हा मला बदल जाणवू लागला. त्यांची बोलायची पद्धत, त्यांचे राहणीमान पाहून मला छान वाटायचे. त्यांना पाहून वाटायचे की या गोष्टी प्रत्येकाकडून शिकायला हव्यात. शिकलेले कधीच वाया जात नाही. वाचन वाढवले, वेगवेगळे चित्रपट पाहिले. वेगवेगळ्या लोकांमध्ये वावरू लागले. कदाचित त्याच्यामुळे माझ्यात बदल होत गेले असतील, असे नुकतेच तिने सांगितले.