शिव दिनविशेषशिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती

१ जुलै १६९३: छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मोघलांकडे गेलेल्या सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामील नवजी बलकावडे या सरदाराची ही कामगिरी.

२ जुलै १६४९: फत्तेखान पराभूत होऊन पळाला, त्या बेलसरच्या छावणीपासून जवळच असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराला पुजेसाठी फुलझाडे लावावयास शिवाजी राजांनी ६ बिघे जमीन अर्पण केली. पहिल्या विजयानंतर श्रींना वाहिलेल्या श्रींच्या राज्यातील या पुष्पदूर्वा !

११ जुलै १६५९: अफजलखानाशी लढावयास शिवाजी राजे राजगडाहून प्रतापगडावर गेले.

११ जुलै १६६७: मिर्झा राजे जयसिंह यांचा बूर्‍हाणपूर येथे मृत्यू.

१२ जुलै – पन्हाळगडच्या वेढ्यातून पलायन: महाराज पन्हाळगडाहून निघाले. रात्री दहाचा सुमार होता. आषाढी पौर्णिमेची ही रात्र होती. (दि.१२ जुलै १६६०) पण चंद्र काळ्याकुट्ट ढगांच्या आड लोपला होता. महाराज पालखीत बसलेले होते. पालखी मावळ्यांनी उचलली. बाजीप्रभू निघाले. ६०० मावळेही निघाले. आणी एक रिकामी पालखीही निघाली. पाऊस, वादळ, विजा अखंड चालू होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. सिद्दी जौहरची छावणी पूर्णपणे गाफील बनलेली होती. शिवाजी उद्यांच शरण येणार आहे ! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले बनले होते. झाडाझुडपातूंन अन् खोगळ्यांतून महाराजांची पालखी धावत होती.

पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होते. छाताडे धडधडत होती. विजा लखाकत होत्या. पालखी धावत होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला ! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता ? त्या रिकाम्या पालखीत आता एक महाराजांसारखा दिसणारा एक जवान बसला. ती पालखी घेऊन १५ – २० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले. आणि महाराजांची पालखी बाजी प्रभुंनी एकदम आडमार्गाने विशाळगडाकडे न्यायला सुरूवात केली. शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. एकदम त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले की, आत कोण आहे ? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजी राजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर मान खाली घालून उभे राहिले. पण जाणकारांनी ओळखले ! काही गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले – की हा तर शिवा न्हावी आहे. ताबडतोब स्वराज्याच्या त्या शिलेदारांची गर्दन उडाली. पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला. नुसताच मनस्ताप – पश्चात्ताप – चिडचिड आणि वडवड. घोड्याला टाच मारून आवघे एल्गारत निघाले…वाटेतील गुढगा – गुढगा चिख्खल तुडवीत.

१३ जुलै १६६० (आषाढ वद्य प्रतिपदा): सिद्दी मसूद दौडत पाठलागावर निघाला. २००० घोडदळ व मागोमाग १००० पायदळ निघाले. पुन्हा तिच वाट. तोच चिखल. तेच शेवाळे. अंधार आणि आडथळे. उजाडले ! आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. आणी आली ! सिद्दी मसूदच्या घोडेस्वारांची आरोळी आली. मावळ्यांची, बाजींची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली. विशाळगड ४ कोस दूर होता.वख्त बाका होता. बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावले. आणी निम्म्या सैन्यानिशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले. महाराज गडावर पोहोचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुंजवणार होते ! सिद्दी आलाच. भयंकर रणकंदन सुरू झाले. खळाळणार्‍या आषाढधारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. लौकरात लौकर गडावर जाऊन इशारतीच्या तोफा उडविण्यासाठी महाराज धांवत होते. महाराजांनी विशाळगडचा पायथा गाठला आणि घात झाला. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी महाराजांवर चालून निघाले. हे आमचेच लोक, पण बादशाही चाकरीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह. सुर्वे व दळवी यांनी महाराजांची वाट आडवली. झुंज सुरू झाली. घोडखिंड लगीनमंडपासारखी गाजत होती. बाजी वाट बघत होते मुहुर्ताच्या तोफेची. दिवस सरला. खिंडीत अद्यापही झुंज चालू होती. गेले २१ तास सारेजण अविश्रांत श्रमत होते. आधी धावताना व नंतर लढताना. संध्याकाळ झाली. अंधार वाढत चालला. आणी कोंडी फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले. भराभरा तोफांची सरबत्ती सुरू झाली. अन् आनंदाचा कल्लोळ बाजींच्या मनी उठला. कामगिरी फत्ते झाली होती. तेवढ्यात खाडकन् घाव बाजींच्या छातीवर बसला ! बाजी कोसळले ! छाती फुटली ! तरिही बाजी आनंदातच होते. “स्वामी कार्यी खर्च जाहलो. आतां सुखे जातो.” हाच तो आनंद होता. गजापूरची खिंड पावन झाली होती. (दि. १३ जुलै १६६०, सायंकाळी सुमारे ७.३० वाजता)

१५ जुलै १६७४: बहादूरखान कोकलताश याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटीची लूट रायगडावर जमा झाली.

२० जुलै १६७२: मोरोपंत पेशवे पंतप्रधान यांनी नाशिक जिंकले.

२० जुलै ते २७ जुलै १६७७: शिवाजी महाराज व एकोजी राजे भोसले यांची भेट.

२२ जुलै १६७८: वेलोरचा किल्ला रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांनी जिंकला.

२५ जुलै १६४८: विजापूर बादशाहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने जिंजीनजीक शहाजी राजांना कैद केले.

२५ जुलै १६६६: दि. ७ जून १६६६ रोजी शिवाजी राजांनी औरंगजेबाकडे मागितलेले परवाने, अखेर आजच्या दिवशी औरंगजेबाने ते परवाने महाराजांना दिले. या परवान्यानूसार शिवाजी राजांना आपल्याबरोबर आलेल्या फौजेला आग्र्याहून रजा देऊन महाराष्ट्रात पाठवता येणार होते.