शिव दिनविशेषशिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती

४ जून १६७४: राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांचे वैदिकविधीवत रायगडावर तुलादान झाले. यासमयी त्यांचे वजन भरले १६० पौंड. या समयी इतक्या वजनाचे तब्बल १७,००० शिवरायी सोन्याचे होन दान करण्यात आले.

५ जून १६७२: मोरोपंत पेशवे पंतप्रधान यांनी जव्हार जिंकून मुक्त केले.

६ जून १६६०: व्याघ्रगड उर्फ वासोटा मराठ्यांनी जिंकला.

७ जून १६६६: आग्र्याहून सुटका प्रकरण. शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर आणलेल्या फौजेला रजा देऊन घरी पाठवण्यासाठी औरंगजेबाकडे परवाने मागितले.

१० जून १६६४: विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. पण त्याने एकदम आल्लाघरीच स्वारी केली. या मोहिमेत तो एकाएकी मरण पावला.

१५ जून १६७०: मराठ्यांनी सिंदोळा घेतला.

मराठ्यांनी सिंदोळा विजापूरकरांकडून जिंकून घेतला. कोणा मातब्बराने ही मोहिम फत्ते केली ? ते काही समजायला मार्ग नाही. इतिहास मुका आहे……….तिथे तर्कही लंगडा पडतो. सामान्य माणसाने घडविलेला असामान्य इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास. लिहून ठेवायची आमच्यात पद्धत नव्हती. पराक्रम करायचा आणि मोकळे व्हायचे.

१५ जून १६७५: कारवारची मोहिम आटोपून छत्रपति शिवाजी महाराज रायगडावर परत.

१६ जून १६७०: माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दि बेग. शिवाजी महाराजांनी छापा घालून माहुली – भंडारदुर्ग आणी पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.

१७ जून १६७४, बुधवार, मध्यरात्र: जिजाबाई साहेब यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन. आनंदनाम संवत्सरात ज्येष्ठाच्या वद्य नवमीला आऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. थोरल्या महाराज स्वामींचे मातृछत्र उडाले. राजा पोरका झाला. दिशा शुन्य झाल्या. आधार संपला. अंधार उरला. फक्त घनदाट अंधार. आता महाराजांना “बाळ” म्हणणारे जगात कोणीही उरले नाही. महाराज एकाएकी प्रौढ झाले.

१९ जून १६७२: मोरोपंत पेशवे पंतप्रधान यांनी रामनगर जिंकले.

१९ जून १६७६: नेतोजी उर्फ मुहंमद कुलीखान पुनश्च हिंदू झाले. शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने विधीवत नेतोजी पालकरांना पुनः शुद्ध करून हिंदु धर्माचे द्वार खुले केले. समर्थांनी लिहिले आहे की, “बंड पाषांड उडाले, शुद्ध अध्यात्म वाढले.” असे का लिहिले आहे, हे अशा घटनांमधून उलगडते.

२१ जून १६६०: चाकणच्या किल्ल्याला शाईस्तेखानाचा वेढा पडला.

२२ जून १६७०: मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.

२४ जून १६७०: मराठ्यांनी रोहिडा जिंकला.

ज्येष्ठ शुद्ध द्वादशी – शंभु जयंती

संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, गुरूवार) [१४ मे १६५७] शिवजयंती आपण १९ फेब्रुवारीस साजरी न करता फाल्गून वद्य तृतियेस साजरी करीत असतो, मग शंभु जयंती तरी इंग्रजी तारखेनुसार का करावी ? तीदेखील ज्येष्ठ शुद्ध द्वादशीस हिंदु दिनदर्षीकेनुसारच साजरी करावी. राजगडाची बांधणी पूर्ण होण्यापूर्वी स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान पुरंदर किल्ल्याला मिळाला असावा असा तर्क या घटनेवरून बांधता येतो. राजघराण्यातील महाराणी ज्या अर्थी पुरंदर किल्ल्यावरती प्रसूत होते, याचा अर्थ महाराजांचे निवासस्थान तात्कालीन कालखंडात पुरंदरावरती होते. पुरंदर बालेकिल्ल्याला दोन टेकड्या आहेत. एका टेकडीचे नाव आहे ‘केदारेश्वर’ तर दुसर्‍या टेकडीचे नाव आहे ‘राजगादी’. ‘राजगादी’ हे नाव खूप सूचक आहे. या राजगादी टेकडीवरूनच शिवाजी महाराजांनी फत्तेखान व मुसेखान यांचा बेलसरजवळील पराभव आणि बाळाजी हैबतरावाचा शिरवळच्या सुभालमंगळावर फडशा पाडलेला होता. या सर्व घटनांचे चिंतन केल्यास पुरंदर किल्ल्यास स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला असल्याच्या तर्कास जागा मिळते.

ज्येष्ठ शुद्ध १३ – राज्याभिषेक दिन

हा दिवस हिंदुसाम्राज्य दिन म्हणून देखील गणला जातो. श्रीशिव या शुभदिवशी छत्रपति झाले. शिवभक्त गो. नी. दांडेकर यांच्या लेखणीतून साकारलेला राज्याभिषेक सोहळा “हे तो श्रींची इच्छा” या कादंबरीतून.

– शिवराज्याभिषेक हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून…..

हशमानं नगारखान्याखालून हेन्रीच्या तुकडीला आत नेलं. एवढ्या उंचावर, एवढ्या दुर्गम स्थळी हे असलं प्रसन्न वैभव उपस्थित असेल, अशी कल्पनाही त्यानं केली नव्हती. सगळा परिसर माणसांनी तुडुंबला होता. निराजी पंडिताचा दुय्यम यांस सामोरा आला. त्यानं यांस एक्या अंगास उभं केलं, आणि तो सगळं समजावून देऊं लागला. यांचं कुतूहल पुरवूं लागला.

– धनी आतां येण्यात आहेत. पांचदहा पळांतच ते येतील. – अलिकडे ते घंगाळ दिसते, त्यात घटिकापात्र आहे. ते भरतांच मुहूर्तवेळा उगवेल. – हा मंडप मुद्दाम या प्रसंगासाठी उभारला आहे. आंब्याची पाने आणि फुले यांनी तो सजवायची इकडे पद्धत आहे. – तो जो चौथरा, तो कायमचा. त्यावर ते सिंहासन, त्यासाठी बत्तीस मण सोने खर्ची पडले. – त्यावर झळाळताहेत, ते सर्व खडे खरेच आहेत, नकली नव्हेत. – सिंहासनाभंवती ती मेघडंबरी, ती लांकडी आहे. – उजवीडावीकडे जागा दिसते, ती राजस्त्रियांसाठी. त्यांचे येणे सुरू झाले आहे. – त्या दोघीचौघींनीं हाती धरून आणल्या त्या जिजाऊसाहेब – होय, त्या बहुत थकल्या आहेत. – ते सिंहासनाभंवताली हाती झाकलेली सोन्याची ताटे घेऊन उभे आहेत, ते अवघे राजसचिव. – मोरोत्र्यंबक, मुख्य प्रधान – रामचंद्र नीलकण्ठ अमात्य – ते रावजी पंडितराव – ते हंबीरराव मोहिते सेनापति – ते वाकनीस – ते डबीर – ते सचिव – ते निराजी पंडित न्यायाधीश –

– भवंताली तो बाह्मवृंदांचा मेळा. सिंहासनाच्या खालच्या जागी पटांगणात थेट इथवर उभे आहेत ते अवघे सरदार. शेटी, देशमुख, देशपांडे, वतनदार, पाटील, कुलकर्णी, बाकी जे अगणित आहेत, देशभरांतून आलेले मराठे. – हां हुश्शार ! ते भालदार चोपदार बिरूदे गर्जत आले. – त्यांच्या पाठोपाठ, मस्तकी शाल गुंडाळलेले ते गागाभट्ट. – आणि त्यांच्यामागे ते – आम्हा सर्वांचे धनी ! स्वत: शिवाजी राजे ! – खांद्यावर धनुष्य आहे. उजव्या हाती विष्णुमूर्ति. पाठीवर बाणांचा भाता आहे. – त्यांच्या मागोमाग पट्टराणी सोयराबाईसाहेब, आणि युवराज संभाजीराजे ! अनिमिष नेत्रांनी हेन्री बघूं लागला.

– राजे सिंहासनासमोर आले. शेजारी बसलेल्या आऊसाहेबांस त्यांनी वाकून प्रणिपात केला. गागाभट्ट आणि बाळंभट्टास वंदन केलं – घटिकापात्र बुडालं – आणि तो धन्यतेचा क्षण येऊन उभा ठाकला – ज्याची हा दगडाधोंड्यांचा देश गेली अनेक शतकं वाट पाहात होता. मायबोली मराठी भाषा. मराठी आचार विचार. मराठी संस्कृति. अणि महाराष्ट्र धर्म. ही अवघी बापुडवाणी होऊन पापण्यांच्या दारवंट्यात उत्सुकतेच्या दिवल्या तेववून ज्यासाठी ताटकळत होती.

– किती शांमुखी जाहजी फाकवील्या. – किती सुंदरा हाल होवोनी मेल्या.

त्या सर्वांचे पुण्यलोकी जाऊं न पावलेले अतृप्त आत्मे – किती किती सन्त महन्तांनी आपापल्या तपश्चर्या ज्यासाठी अर्पिल्या होत्या. कित्येक आईच्या पुतांनी आपापली तुच्छ शरिर ज्या एका मुहोर्ताच्या उगवण्यासाठी अनेकानेक स्वातंत्र्ययोद्धयांची कबंध तळहाती शिरं घेऊन झुंजता झुंजता ज्यासाठी समरभूमीवर खर्ची पडली होती.

रंजल्यागांजल्यांचे आक्रोश त्यांच्या दबलेल्या कंठातून न फुटतां ज्यासाठी इतकी वर्ष घुसमटले होते ज्यासाठी व्रतं – वैकल्यं – तीर्थाटनं – तपश्चर्या – किंबहुना अवघ्या उत्सुकता ज्यासाठी ताणल्या गेल्या होत्या – अवघे सत्यसंकल्प ज्यासाठी उच्चारिले गेले होते. अवघी पुण्यं ज्यासाठी समर्पित केली गेली होती. तो शुभमुहुर्ताचा मुकुटमणि तो स्वातंत्र्यसूर्याचा उदयकाल स्वर्गीच्या देवतांच्या अन् यक्षगंधर्वांच्या साक्षीनं तो दैदीप्यमान क्षणार्ध उलटला –

आणि कृतज्ञतेच्या भारानं भारावलेली पावलं टाकीत तो मराठ्यांचा अतिशय आवडता राजा सिंहासनाजवळ पोंचला. त्याक्षणी त्याच्या मनी लक्ष लक्ष वादळं उठली आणि विझली. त्या सर्वांवर ताबा मिळवून त्या धीरगंभीरानं कृतज्ञतेच्या भारानं मस्तक पळभर लववलं. त्या सर्व जिवलगांचे स्मरण केलं, की जे या पवित्र क्षणी उपस्थित नव्हते. त्यासर्व स्वातंत्र्ययोद्धयांना वंदन केलं, की ज्यांच्या बलिदानामुळं ही अमृतवेल स्वप्नांतून प्रत्यक्षांत अवतरली होती. आणि मग जिथून आवडता राजगड स्पष्ट दिसत होता, त्या सिंहासनास पाय न लावता त्यावर तो आरूढ झाला !

गागाभट्टांनी वैदिक मंत्र म्हणायास प्रारंभ केला –महते क्षत्राय महते आधिपत्याय महते जानराज्याय एष वो भरतो राजा सोमोऽस्माकं ब्राह्मणांना राजा ॥

हातींचं रत्नजडित, रेशमी छत्र त्यांनी राजाच्या मस्तकी धरलं, आणि घनगंभीर स्वरात ते गर्जले,

क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपति की जय हो !

तत्क्षणीं शिंगं, कर्णे, तूतबंबाळ, चौघडे यांचा एकच गर्दघोष झाला. ठासून ठेवलेल्या तोफांचे दुडुम दुडुम बार झाले. बरकंदाजांच्या बंदुका सुटल्या. जणूं धरणीकंप व्हावा, ती गत झाली. न कळत हेन्रीचं मस्तक शिवछत्रपतींसमोर झुकलं.

२६ जून १६६४: सुरतकर इंग्रजांचे कारवारकर इंग्रजांना इशारतीचे पत्र. या पत्रात इंग्रजांना शिवाजी राजांपासून सावध राहण्याविषयी इशारा दिलेला आहे.