शिव दिनविशेषशिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती

२ मार्च १६६०सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. .

२ मार्च १७००औरन्गजेबाने शंभुराजांची अमानुष हत्या केली…आता मराठे घाबरतील,शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं…पण घडलं भलतचं….शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला…राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरन्गजेबाला टक्कर देवू लागले…दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले…या काळात राजारामराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अशा कारभारयांची साथ लाभली…मुघलांशी निर्णायक युद्ध जिंकने अशक्य होते…म्हणून राजारामांनी मुघलांनी मिळवलेला जो भाग मराठे जिंकतील तो भाग त्यांची जहागीर बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले…वेग-वेगळे मराठा सरदार जागो-जागी मुघल सैन्यावर आक्रमण करू लागले..संधी मिळताच त्यांचा पराभव करून रसद लुटू लागले…आपली पिछेहाट होताना दिसताच पसर होवू लागले..मुघलंनी जिन्जिला वेढा दिला…पण राजाराम पसार होवून विशालगडावर गेले…तेथून सातारा,कर्नाटक पुन्हा महाराष्ट्र अशा चकमकी होवू लागल्या..महाराष्ट्रात मुघलांना धुळ चारायची हेच एकमेव लक्ष्य मराठ्यांसमोर होते. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायाला ते तयार होते.. त्यांना सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा होताच. शेतकरी दिवसा शेती करून रात्री सैनिक बनत होता..परन्तु, दुर्दैवाने महाराष्ट्राची पाठ सोडली नाही.. २ मार्च रोजी सिंहगडावर मराठ्यांचा तिसरे छत्रपति राजाराम राजांचा सिंहगडावर मरण पावला..निधन झाले तेंव्हा राजाराम महाराज ३० वर्षाचे होते.. त्यांच्या काळखंडातच सिन्धुदुर्गावर शिवरायांचे मंदिर उभारन्यात आले.

२ मार्च १८१८: इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्र्यात आल्यवर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली.

३ मार्च १६७९: मोरोपंत पेशव्यांनी विजापूरकरांकडून कोप्पळ जिंकले.

३ मार्च १६६५: मोगल सरदार मिर्झाराजा १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील ३ वर्षात शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहिस्तेखानाची बोटे कापली, सुरत बेसुरत केली आणि त्यावर पत्र पाठवून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळविले, आता औरंगजेबाला सर्वात जिगरबाज सरदार दख्खन मध्ये पाठवणे भाग होते.

मार्च शिवजयंती – फाल्गुन वद्य तृतीया (शके १५५१)शिवजयंती.
हिंदुपदपादशाहीच्या ‘मंत्राची’ जयंती.
जिजाऊ आऊसाहेबांच्या ‘शिवबाची’ जयंती.
तानाजी रावांच्या ‘मैतराची’ जयंती.
बाजी प्रभूंच्या ‘प्राणाची’ जयंती.
कवीराज भूषणाच्या ‘सरजा शेर शिवराजाची’ जयंती.
सह्यदेवतेच्या अन् दर्या भवानीच्या ‘उपासकाची’ जयंती.
समर्थ रामदास स्वामींच्या ‘शिवकल्याण राजाची’ जयंती.
शंभुबाळाच्या आबासाहेबांची ‘म्लेंछक्षयदीक्षितांची’ जयंती.
राष्ट्रपुरूषाची जयंती.
“राष्ट्रपित्याने” वर्णिलेल्या ‘वाट चूकलेल्या देशभक्ताची’ जयंती.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुनृसिंहाची’ जयंती.
शाहिराच्या डफावर कडाडणार्‍या वीररसाची जयंती.
कलियुगातील भगिरथाची जयंती.
महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानच्या अस्मितेची जयंती.
छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती.
नव्हे – नव्हे ही तर महाराष्ट्र मनाच्या महादेव ईश्वराचीच जयंती

४ मार्च १६६०: सिद्दी जौहरने पन्हाळा गराडला. शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले.

४ मार्च १८१८: विसापूरचा किल्ला कर्नल पर्थारणे तोफा डागून उध्वस्त केला. आज किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे .

५ मार्च १६६६, सोमवार: औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजासह !!!

६ मार्च १६७०: जिंका आदेश दिधला शिवभूपातींनी (कोंडाजी फर्जंद)

६ मार्च १६७३, रात्री: महाराजांचा अतिशय आवडता व तेवढाच महत्वाचा पन्हाळगड अद्यापपावेतो स्वराज्यात आलेला नव्हता. कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली. कोंडाजी फर्जंद हे केवळ साठ जवानांसह गडाचा कडा चढून गेले आणी त्यांनी आदिलशाही फौजेवर त्या काळोख्या मध्यरात्री हल्ला चढविला. किल्लेदार ठार झाला ! गड मिळाला ! महाराज निहायत खूश झाले कोंडाजी फर्जंदांची अस्मानी फते झाली.

७ मार्च १६४७: शिवाजी महाराजांचे राजकारणातील, विद्येच्या प्रांगणातील व क्षात्रकारणातील गुरू दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.

७ मार्च १६६५: सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंतसिंह राठोड पुण्यातच हाय हाय करित बसला होता. त्याने शिवरायांविरूद्ध नंतर एकही पाऊल उचलले नव्हते. मिर्झा राजांना पुण्याचा अम्मल देऊन टाकून जसवंत सिंह याच दिवशी दिल्लीला निघून गेला.

८ मार्च १६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला.ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.पौर्णिमा शके १५८६ : कारवारहून इंग्रज मास्टर ह्याने चैत्र शुध्द ८ शके १५८७ मधील सुरतेला लिहिलेल्या पत्राच्या आधारें छत्रपतीशिवाजीराजे गोकर्ण महाबळेश्वर येथें होते.
शके १५९१ : छत्रपतीशिवाजीराजे ह्यांची कनिष्ठ धर्मपत्नि राज्ञी सोयराबाईसाहेब ह्यांना राजारामराजे पुत्र झाला.
शके १५९२ : सिद्धी कासीमने दांडा – राजपुरीवरील छत्रपतीशिवाजीराजांचा दारू कोठार असेलेला सामराजगड घेतला.

९ मार्च १६५०: तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, फाल्गुन वद्य द्वितीया शके १५७१ प्रथम प्रहर.

९ मार्च १६७३: कोंडाजी फर्जंदांनी जिंकलेला पन्हाळगड पाहण्यासाठी शिवाजी महाराज प्रतापराव गुजरांसह रायगडाहून निघाले.

१० मार्च १६७३: रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना वाटेत शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास भवानी देवीची शोडषोपचारे पूजा.

१० मार्च १६७७: ५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिणदिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान.

१० मार्च १६७९: शिवाजी महाराजांचे सरदार थोरले आनंदराव यांनी विजापूरकरांकडून बाळापूर जिंकले.

१० मार्च १७०४: औरंगजेबाने स्वतःच्या ८९ व्या वाढदिवशी तोरणा उर्फ प्रचंडगड जिंकला.

११ मार्च १८१८: कर्नल पोर्थेरणे कोरीगडावर हल्ला केला, ४ दिवसांनी दारू कोठार तोफेने नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.

११ मार्च १६८९ – छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिवस … !गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला छत्रपति संभाजी महाराजांचा वधु – तूळापूर येथे शिरच्छेद करण्यात आला.१ फेब १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कुलेश यांना संगमेश्वर येथे कैद केले गेले. बहादुर गड़ येथे त्यांच्यावर भयानक आणि असंख्य हाल केले. पहिल्या दिवशीच त्यांचे नेत्र फोडले गेले. त्यांची जीभ कापली गेली. कोडे मारून नंतर अंगावरील चामडी सोलण्यात आली. अखेर शेवटी ११ मार्च १६८९ ला धर्मं आणि राज्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.

११ मार्च १८१८: दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला.४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.

१४ मार्च १६४९: शिवरायांनी शहाजीराज्यांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ – २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

१५ मार्च १६६१: शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या.

१५ मार्च १६६५: मिर्झा राजे व दिलेरखान पठाण यांनी पुण्याहून पुरंदराकडे कूच केली.

१५ मार्च १६७०: शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा.

१५ मार्च १६८०: राजाराम महाराजांची मुंज व लग्न. मुलगी वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई / ताराबाई. शिवाजी महाराजांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य. यानंतर १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.फाल्गुन अमावस्या – छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथीहिंदुं नववर्ष दिन. उद्याच्या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची ‘याद’ मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना – काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी – भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.

अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त – लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.

कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. “दीन दीन” “अल्लाहो अकबर” च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे ‘हलाल’ करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो…..!!!

शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून २ साधी फुलेही वाहात नाही.
उलट आमच्यातीलच काही हिंदु तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही आभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत. आम्हाला क्षमा करा. आम्हाला नर्कातही जागा मिळणार नाही….आम्हाला क्षमा करा.

१५ मार्च १६६९: पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे समान देवून. त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले ते लग्न १५ मार्च १६६९ ला झाले

१६ मार्च १६७३: शिवाजी महाराज ९ मार्च रोजी रायगडाहून निघाले ते पाचाडास आऊसाहेबांचे दर्शन, पोलादपूरास कविंद्र परमानंद यांचे दर्शन घेऊन प्रतापगडमार्गे पन्हाळगड बघण्यासाठी निघाले. कोंडाजी फर्जंदाने नूकताच काबीच केलेला पन्हाळगड !

गडावरील मंडळिंनी त्यांना येताना लांबूनच पाहिले व त्यांच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी गडावर गडबड उडाली. गडावर दत्ताजी पंत वाकेनिवीस होते. इतर सर्व मंडळी होती. त्यांची धांदल उडून गेली. महाराज गडावर पोचले. आनंदाचे उधाण आले. दत्ताजी पंतांनी अक्षरशः सोन्याची फुले महाराजांवर उधळून त्यांचे स्वागत केले. दक्षिण दरवाजावरील भालदारांनी ललकार्‍या दिल्या. गडावरचे झाडून सारे स्त्रीपुरूष त्यांचे उत्साहाने स्वागत करीत होते व दर्शन घेत होते.
नंतर महाराजांनी संबंध गडाचे अति प्रेमभराने दर्शन घेतले. कोंडाजी फर्जंदाचे व गड जिंकणार्‍या सर्व चित्त्यांचे त्यांनी मनःपूर्वक कौतूक केले. त्यांना सर्वांना खूप खूप धनदौलत देऊन त्यांची पाठ थोपटली. त्यांची धाडसी करामत पाहून महाराजांना धन्य धन्य वाटले अन् असा मायावंत राजा मायभवानीने आपल्याला दिला म्हणून त्यांही सर्वांस धन्य धन्य वाटले.१२ वर्ष नंतर पन्हाळा स्वराज्यात सामील झाला. त्या नंतर शिवाजी महाराज पन्हाळ्या वर पोहचले. अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जदने जिंकला.

१७ मार्च १८६३: दिन दलितांचे कैवारी महाराज सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिननाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी जन्मलेले गोपाळ काशीराम गायकवाड, बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोद्यामध्ये दत्तक म्हणून गेले. पुढे ते महाराजा सयाजीराव गायकवाड नावाने उदय यास आले.  सयाजीराव एक प्रजाहितदक्ष, आदर्श, लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी आपल्या छोट्याश्या संस्थानात विविध सामाजिक सुधारणा केल्या. काळाच्या पुढे असणारे राजे म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला.

सयाजीरावानी न्यायव्यवस्थेत सुधारणा केली, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय, गरीब, गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण व कला शिक्षणाची सोय, संस्कृत ग्रंथ प्रदर्शन, दलितांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण याचबरोबर स्त्रियांना वारसा हक्क, बालविवाह बंदी, विधवा विवाह, कन्या विक्रीय बंदी अशा असंख्य सुधारणा त्यांनी घडवून आणल्या आणि आपल्या संस्थानात स्त्रीमुक्तीची पहाट घडवून आणली. प्रगाढ विचारवंत आणि अत्यंत पुरोगामी असणाऱ्या या राजाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थानही भूषविले. १८८६ साली एका समारंभात सयाजीरावानी मुंबई येथे ज्योतीराव फुलेना महात्मा ही पदवी बहाल केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली. अशा या लोकमंगल राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ साली निधन झाले.

१८ मार्च १६७९: मराठ्यांनी विजापूरकरांकडून बहादूरबिंडा जिंकले.

१८ मार्च १६८०: सर्जाखानाला विजापुरी सेन्याचा मुख्य सेनापती केले .
.
१८ मार्च १६८८: हरजीराजे महाडिक ञिणामल्लीहून कंचीवर गेले .

१९ मार्च १६४६: शिवाजी महाराजांनी पुण्यात कसबा गणपतीचा जिर्णोद्धार करून, मंदीरास नंदादीप दिला.

१९ मार्च १६७४: शिवरायांची धाकट्या पत्नी काशीबाईसाहेब यांचा रायगडावर मृत्यू.

२० मार्च १६६६: नेतोजी पालकर मिर्झाराजांच्या विनंतीमुळे विजापूरकरांना सोडून मोगलांना सामील.

२१ मार्च १६८०: शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली. ह्यानंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले

२२ मार्च १६८२ – तब्बल पाच वर्षे मराठ्यांची झुंज: औरंगजेब बादशहा औरंगाबदेला पोचला आणि वेळ न दवडता लढाईचे मनसूबे आखु लागला. त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बादशाहला वाटले होते की अगदी थोड्याच अवधित मोघली फ़ौज मराठ्यांचा हा मुलुख काबिज करील आणि म्हणुनच त्याने आधी मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरविले.

त्याने शहाबुद्दीन फिरोजजंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला – रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे उधळून लावले.किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले रामसेजच्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले.इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली.संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुर खानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. ७००० मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली.मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव  अचूक ओळखला.ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगारे, नौबती, कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येऊ लागले आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले.                                       

बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही.

मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वार झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता. रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार, त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासालाच्या पानात सापडत नाही हे दुर्दैव.

त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला.किल्लेदाराच्या आणि मराठ्यांच्या हातून घडलेल्या या अद्वितीय पराक्रमाची किंचित सुद्धा जाणीव त्यांना स्वतःला नव्हती. राजपूत, शिख, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि अश्या अनेक शत्रूंच्या राजधान्या काही दिवसात खालसा करणाऱ्या या मोघली फौजेला अर्ध्या दशकाहुन अधिक काळ नुसत्या रामसेजने झुंजवले.(डॉ. कमल गोखले लिहितात की या किल्लेदाराचे नाव होते रंभाजी पवार)

२ मार्च १७५५: इंग्रज – पेशवे यांचा तह. यान्वये इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले. तूळाजी आंग्रे जुमानीत नाही म्हणून स्वतः पेशवे आपल्याच आरमाराच्या जीवावर उठले होते.

२३ मार्च १६७८: ऑक्टो १६७६ मध्ये महाराजांनी दक्षिण स्वारीसाठी प्रस्थान केले. महाराजांनी शंभूराजांवर प्रभावळीचा कारभार सोपवला. आणि जे घडायला नको होते ते आक्रीत घडले. स्वतःचे वडील आणि राज्याचे राजे श्रीशिवछत्रपती हयात असताना शंभूराजांनी स्वत:स शृंगारपुर येथे कलशाभिषेक करवून घेतला. एवढे मोठे पाऊल उचलताना कवी कलश हे शंभूराजांसोबत होते.

दि. २४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७: दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवरायांचा श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम. भाग्यनगर (सध्याचे हैदराबाद) पासून काही अंतरावर असलेल्या या पवित्रस्थानी राजांचे काही काळ वास्तव्य होते. येथे असलेल्या गोपुरास ‘श्री शिवाजी गोपुर’ असे नाव असून तेथे शिवरायांचे हातात तलवार घेतलेले दगडामधले कोरीव शिल्प पहावयास मिळते.

२५ मार्च १६८९: झुल्फिकारखानने मराठ्यांच्या राजधानीस (रायगडास ) वेढा दिला.

२७ मार्च १६६७: मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली.नेतोजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले.जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला ‘प्रतिशिवाजीची’ आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या ‘मुहंम्मद कुलीखानास’, दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

२८ मार्च १६७०: आग्र्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी उठवलेल्या वादळी झंझावताला रोखण्यासाठी औरंगेबाने दाऊदखानाला दक्षिणेत धाडले टो २८ मार्च रोजी नगरला पोहचला

२९ मार्च १६६७: सिंधुदुर्ग पूर्णत्वास आला

३० मार्च १६४५: वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे – कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर
आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले.

हे फर्मान छ ११ सफर सु || खमस अर्बैन अलफ म्हणजे ३० मार्च १६४५ यां तारखेचे आहेजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना खालील पत्र पाठवले. ‘हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे’ या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढविले.

३१ मार्च १६६५: मिर्झा राजे जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी येऊन दाखल. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु.