शिव दिनविशेष: शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती
४ सप्टेंबर १६७७: संभाजी राजे व येसुबाई साहेब यांना शृंगारपूर येथील मुक्कामी भवानी बाई नावाचे कन्यारत्न झाले.
५ सप्टेंबर १६५९: सकल सौभाग्य संपन्न, वज्र चुडे मंडित सईबाई राणी साहेब यांचे राजगडावर निधन. संभाजी राजे अकाली पोरके झाले. यावेळी शिवाजी राजे अफजल खानाचा सामना करण्यासाठी प्रतापगडावरती वास्तव्यास होते. काय घालमेल उडाली असेल नाही का महाराजांची ?
७ सप्टेंबर १६६१: शिवाजी राजांना कन्यारत्न झाले. तिचे नाव सकवारबाई ठेवले. पण कोणत्या राणीसाहेबांस हे कन्यारत्न झाले हे इतिहासास ज्ञात नाही.
१२ सप्टेंबर १६६६: आग्र्याहून सुटका करून घेऊन शिवाजी महाराजांचे त्यांच्या जिवलगांसहीत राजगडावर आगमन. शिवाजी राजे व त्यांचे जिवलग हे संन्याशाच्या वेशात राजगडावर आले. प्रमूख संन्यासी होते निराजी रावजी व उर्वरीत शिष्य-गण. या गोसाव्यांनी आऊसाहेबांना भेटण्याची इच्छा प्रगट केली. व आऊसाहेबही त्यांच्या इच्छेला मान देऊन राजगडाच्या पद्मावती माचीवरील सदरेवर ‘दर्शनासाठी’ आल्या. प्रत्येक महपुरूषाचे दर्शन घेत जेव्हा त्या महाराजांसमोर आल्या तेव्हा न राहावून महाराजांनी आपल्या माय माऊलीच्या पाउलांवर लोटांगण घातले व मायमाउलीच्या पाऊलांवर आश्रुंचा आभिषेक केला. आऊसाहेबांना अतिशय सुखद धक्काच होता तो ! आपण राजगडावरील सदरेवर जातो तेंव्हा या दिव्य प्रसंगाची आपल्याला कधी आठवण येते का हो ? का आपण केवळ तिथे चकाट्या पिटत बिड्या ओढतो ?
१८ सप्टेंबर १६६७: शिवाजी महाराज ‘स्वराज्याची पाहणी करण्याकरता’ म्हणून कुडाळला गेले. जानेवारी १६६८ मध्ये महाराजांनी गोव्यातील फिरंग्यांवर हल्ला चढविलेला आहे. याचे अवलोकन केल्यावर ते कुडाळला नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले असतील याचा अंदाज बांधता येतो.
२२ सप्टेंबर १६६०: शिवाजी राजांच्या आज्ञेने पन्हाळगड सिद्दी जौहरच्या स्वाधीन.
२४ सप्टेंबर १६५६: सुपे गढी शिवाजी राजांकडून जप्त. पैसे खाऊन बादशाहीचे राज्य चालविणार्या मोहिते मामांना मुसक्या बांधून धरले व त्यांची कर्नाटक प्रांती रवानगी. हे मोहिते मामा म्हणजे शिवाजी राजांचे प्रत्यक्ष मामाच होते. पण तरिही शिवरायांनी अन्यायाविरूद्ध श्रीकृष्णाचाच कित्ता गिरवला.
२४ सप्टेंबर १६७४: निश्चलपुरी गोसावींच्या समाधानाकरिता शिवरायांनी पुन्हा रायगडावर तांत्रिक पद्धतीने स्वतःस राज्याभिषेक करून घेतला.
२५ सप्टेंबर १६७४: प्रतापगडावरील घोड्यांच्या पागेवर वीज कोसळून कित्येक सुंदर घोडे जळाले. यांत एक हत्तीही होता. जिजाऊसाहेबांच्या निधनानंतर (१६ जून १६७४) लगेचच काही दिवसांनंतर ही हृदयद्रावक घटना घडली.
२७ सप्टेंबर १६६५: औरंगजेबाचे शिवाजी महाराजांच्या नावाने कृपेचे फर्मान व पोशाख येऊन दाखल. मिर्झा राजांच्या हुकूमाने शिवाजी राजे तळकोकणातून येऊन मिर्झा राजे जयसिंहाच्या छावणीत दाखल. पुरंदरच्या तहाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू.